Posted in गोष्ट, धना

”धना” भाग १३ वा

”धना”

भाग १३ वा

एव्हाना दुपारी ४ वाजून गेले होते.
सूर्याजी आणि धना दोघेही कुस्तीच्या तयारीला लागले.
मैदानात प्रेक्षकांचा महापूर आला होता.सूर्याजीने कपडे काढले.लंगोट लावत हनुमंताचे स्मरण केले.पांढरीशुभ्र लंघ परिधान केली.गळ्यातील चांदीची पेटी असलेले ताईत काढून ठेवले.अंगावर पांढरे उपरणे घेतले आणि समवेत आलेल्या ३-४ मल्लांच्या समवेत सूर्याजी मैदानाच्या उजव्या अंगाने धावत मैदानात आला.
सूर्याजीची शरीरयष्टी पाहताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडात सुरु केला.सूर्याजीने धावत धावत मैदानाला उजवीकडून डावीकडे प्रदिक्षणा काढत दोन्ही हात उंचावत प्रेक्षकाना अभिवादन केले आणि अंगावरील पांढरे उपरणे सोबत आलेल्या मल्लाच्या हातात दिले ..आणि मातीत वज्रासन घालत मातीचे चुंबन घेतले.
कमरेचे स्नायू ढिले होतील असे आळोखे देवून सूर्याजी उठला आणि मैदानाच्या मध्यभागी असलेल्या भव्य मंचाकडे पाहत शड्डूचे घुन्त्कार केले.
जो मल्ल ही मानाची कुस्ती जिंकेल त्याची ख़ास कोल्हापुर संस्थांनच्या हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात येणार होती.

सुर्याजीच्या शड्डूने प्रेक्षकांनी आणखीन कल्लोळ सुरु केला आणि टाळ्या वाजवल्या…!

धनाच्या खोलीतून एव्हाना कोणीही येताना दिसत नव्हते,मात्र अचानक ४-५ शीख मंडळी हातात मोरपिसाचे गुच्छ आणि धुपदानी घेऊन बाहेर आले ,त्या शीख मल्लांच्या कमरेला तलवारी लटकल्या होत्या,पुढे दोन शीख जाट मल्ल आणि मागे दोन जाट मल्ल आणि बरोब्बर मध्ये सुवर्णकांतिसम धना हा बिल्ला पंजाबी च्या रुपात धीरगंभीर चाल चालत मैदानाच्या डाव्या अंगाने आखाड्यात प्रवेश करू लागला..!
डोक्यावर गुलाबी शीख पद्धतीचे किमांश,भगव्या रंगाची लांघ,भव्य कपाळावर पांढर्या भस्माचे आडवे पट्टे आणि उघड्या अंगावर मोरपंखी रंगाचे उपरणे…आणि धुपदानीच्या सुगंधीत धुरात धनाचा मैदानात प्रवेश होत होता,जणू स्वर्गातून गंधर्वयोध्दा भूतलावर अवतीर्ण होत आहे असे दृश्य…!
आखाड्याच्या वर येताच धनाने अंगावरील उपरणे काढून सोबत असलेल्या शीख मल्लाकडे दिले,पगडी उतरली,गळ्यातील खंड्याचे चुंबन घेत तोही काढून दिला..!
कमरेत वाकून मातीला स्पर्श केला …आणि उभा राहून सूर्याला वंदन केले..!
आणि उजव्या दंडाने डाव्या दंडावर आकाशपाताळ दणाणून सोडणारे शड्डू ठोकले..शड्डूच्या घुन्त्काराने अणुरेणु शहारले आणि मैदानातील प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बिल्ला च्या रूपातील धनाने स्वागत केले..!
धनाने मैदानाला प्रदिक्षिणा घातलं दोन्ही हातांनी प्रेक्षकाना अभिवादन केले..!
समोर असलेल्या मंचकावर वस्ताद काका ,पाटील आणि कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातून आलेली मातब्बर मंडळी बसली होती..!
वस्ताद काकानी बिल्लाची ती चाल,ती शड्डू ठोकायची पध्दत धनाची आहे हे लगेच ओळखले ..पण वस्तुस्थितीला ते अमान्य होते.
सारा महाराष्ट्र बिल्ला आणि सूर्याजी लढत पहायला जमला होता.
वास्तदांचा अंदाज जाणूनबुजून फोल ठरत होता..!
मैदानाच्या दुतर्फा मान्यवरांनी आणि ठेकेदारांनी हलगी घुमके आणि रणशिंगाच्या निनादात प्रवेश केला.
हलगीच्या आणि तुतारीच्या आवाजाने अवघ्या मैदानात वीरश्री संचारली होती.
दोन्ही मल्लांनी मान्यवरांचा चरणस्पर्श केला..!
मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली …आणि एक बलाढ्य आवाजाचा हारकारा आपल्या पहाडी आवाजात पैलवानांची ओळख करून देऊ लागला…!

” ऐका हो ऐका….राजर्षी शाहूंच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात आज महाराष्ट्र विरुध्द पंजाब अशी खरसेल कुस्ती भोसले वस्ताद ठेकेदार यांच्या पुढाकाराने होत आहे ,पंजाबचा जाट मल्ल बिल्लासिंग हजार मैलांचा प्रवास करत कोल्हापुरातील सूर्याजी जाधवराव या वनखात्यातील मल्लाला आव्हान द्यायला आला आहे ,
सूर्याजी पाच वर्षापुर्वीचा महाराष्ट्रातील क्रमांक एकचा मल्ल होता,त्याने बिल्लाचे हे आव्हान स्वीकारत पुन्हा लांघ लंगोट लावला आहे.
ठेकेदार कराराप्रमाणे कुस्ती बेमुदत निकाली होईल ,कोणत्याही अवस्थेत कुस्ती सोडवली जाणार नाही याची नोंद दोन्ही मल्लांनी घ्यायची आहे ”

हारकार्याचा पहाडी आवाज ऐकताच मैदानात स्मशान शांतता पसरली होती.
बिल्ला आणि सूर्याजी आमनेसामने आले,दोन चिमटी माती उचलून एकमेकांच्या हातात देत हातसलामी झडली…सूर्याजीने एका हाताने मंचकावर उपस्थित वडील आणि वस्ताद तथा पाटील याना अभिवादन केले…धनाने मैदानाच्या उजव्या बाजूला एका दाढीदार आणि सर्वापेक्षा उंच असलेल्या आणि भगव्या उपरण्याने सर्वांग झाकलेल्या आपल्या सेनापतीना वंदन केले ……सेनापतींनी दोन्ही डोळे बंद करून परत उघडले हि खून करून धनाला नियोजित काम सुरु करायचा आदेश दिला…!

दोन्ही मल्ल पुन्हा जवळ आले आणि दोन्ही हाताची चौदंडी सुरु झाली.

धनाने सुर्याजीच्या हातात हात देताच डोळे बंद करून ताकतीचा अंदाज घेतला.
सूर्याजीला प्रचंड ताकत होती हे त्याला जाणवले …!
सूर्याजी पण बिल्ला च्या ताकतीचा अंदाज घेऊ लागला.
बोटातील पकड एकदम हलकी वाटली,आणि त्याने अंदाज केला कि बिल्ला काहीच ताकतीचा नाही ….!
पहिल्या १० मिनिटात दोन्ही मल्लांनी कुस्तीतील पहिले प्रकरण चौदंडी संपवून मनात एकमेकाविषयी काही आराखडे बांधले आणि पुढील व्यूहरचनेत लागले.

धना माल्लाविद्येतील गूढ ज्ञानाचा अभ्यासक होता,त्याला माहित होते कि हाताच्या पकडीवरून प्रतिस्पर्धी ताकतीचा अंदाज बांधतो,म्हणून त्याने मुद्दाम पडत ढिली ठेवली होती.

कुस्ती पुन्हा सुरु झाली.सूर्याजीने आता कुस्तीला फार वेळ न लावता बिल्ला ला ओढून दमछाक करावे असे योजले आणि सुदर्शन चाकरासारखे दोन्ही हात चालवत धनाची गर्दनखेच करू लागला..!
धनाच्या मानेवर बसणारे ते प्रचंड आघात पाहत धना सुर्याजीच्या ताकतीचा अंदाज घेऊ लागला.
हे करत असताना त्याची विचारशक्ती किंचितही थांबली नव्हती.
त्याने सुर्याजीच्या त्या हल्ल्याचा सेकंदाच्या आत तर्क काढला कि सूर्याजी ताकतीने खूप आहे मात्र उतावळा आहे,संयम कमी आहे आहे लगेच निकाल करावा असे त्याच्या मनात आहे.
धनाने हेही ताडले कि दैनंदिन जीवनात धना एखादी गोष्ट मिळवायला खूप कष्ट करेल आणि जेव्हा ती गोष्ट त्याला मिळण्याच्या मार्गावर असेल तेव्हा तो उतावीळ पणा दाखवत असणार …!

धना मल्लाविद्येतील हे गूढ ज्ञान शिकला होता,प्रतिस्पर्ध्याच्या खेळण्याच्या ढबीवर त्याचे एकूण व्यक्तिमत्व कसे असावे याचे कोष्टक तो मनात काही सेकंदात बनवत असे ,हे मल्लविद्येतील अतिशय गूढ ज्ञान होय.
धनाला पाहायचे होते,राजलक्ष्मी ला ज्याच्या हातात द्यायची आहे तो मन मेंदू आणि मनगट आणि एकंदरीत व्यक्तिमत्वाने कसा आहे..!

सुर्याजीच्या हल्ल्याचा धनावर काहीच फरक नव्हता,मात्र त्याच्या सुरवातीच्याच आघाताने प्रेक्षकांनी वाहवा केली.दोघेही मल्ल घामाने भिजून गेले आणि त्यांच्यावर तांबडी माती टाकल्याने चिखलाने सर्वांग माखू लागले.

धना ला सूर्याजीचा हा प्रतिकार रोखावा लागणार होता ,तो सुर्याजीच्या गर्दनखेचीला एका हाताने धरून दोन पावले मागे सरला,बिल्ला मागे सरतोय हे पाहताच सूर्याजी दोन पावले पुढे सरकू लागला,आणि तो दोन पावले पुढे येताच धना दोन्ही गुडघ्यावर पटकन खाली बसला आणि सुर्याजीच्या दोन्ही पायाला हाताने मिठी मारली…एका क्षणात दुहेरी पट काढून सुर्याजीवर कब्जा घेतला..!

उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट केला.
धनाने सुर्याजीच्या मानेवर हाताने घुटना ठेवला आणि त्याची मान चांगलीच रगडणे सुरु केले.
सूर्याजीने विचार केला कि आपला कयास चुकला.बिल्ला कमी ताकतीचा नसून डावखुरा आहे.त्याने मुद्दाम आपल्याला दमवण्यासाठी हि चाल खेळली.’
आता काय उपयोग नव्हता ,आता बिल्लाच्या पकडीतून निसटणे हेच मोठे काम होते.सूर्याजी मातीशी घट्ट पकड ठेवत आपला मजबूत पवित्रा ठेवला..!

धना ने सुर्याजीच्या मानेचे स्नायू चांगलेच ढिले केला आणि विचार केला कि अजून काही मिनिटात याला चक्कर येईल ,पण नको असे करायला ..अजून याचे बरेच व्यक्तिमत्व माहित करून घ्यायचे होते .
असा विचार करत धनाने मानेचा घुत्ना काढला आणि सुर्याजीच्या पायाला हात घालून त्याला उठून जायला संधी दिली…मात्र सावध सूर्याजी तरीही बसून होता .कारण आता तो पूर्ण सावध होता ,त्याला बिल्लाची हि चाल असावी असे वाटले.
सूर्याजी उठत नाही हे पाहताच धनाने इराणी एकलंगी डावाची पूर्ण ताकतीने पकड घेतली आणि सूर्याजीचा उजवा पाय गुडघ्यातून दुमडून त्यात आपल्या पायाचा फास अडकवला आणि क्षणात संपूर्ण देह सुर्याजीच्या डोक्याकडे वळवला….आणि आर्त किंकाळीने सूर्याजी ओरडता…….माझा पाय….!
सारे प्रेक्षक ओरडू लागले …कुस्ती उठून लावा…पाय सोडवा …!
पण धनाने पूर्ण शास्त्रोक्त पाय ओढला होता,केवळ नासा दाबल्या जाव्यात आणि कुस्ती समोरासमोर यावी ….!
पंचानी धनाला डावाची पकड सोडवून सूर्याजीचा पाय सोडवला..!
धना बाजूला उभा राहिला..!
मंचकावऋण वस्ताद काकानी बरोबर ओळखले कि हा बिल्ला म्हणून लढत आहे तो माझा धनाच आहे,पण बिल्ला म्हणून कसा लढेल…माझेच काहीतरी चुकत असावे….!
धनाने गर्दीत उभ्या असलेल्या सेनापतीला काहीतरी खून करावी म्हणून कमरेवर हात ठेवून कंबर फिरवली….सेनापातीनी मान नकारार्थी हलवली.
धनाने ओळखले काय ओळखायचे आहे ते….!!!!

एव्हाना सुर्याजीच्या पायाला काहीही झाले नव्हते आणि तो लढायला तयार होता.
कुस्तीला जवळपास दीड तास होत आला होता.
दोन्ही पैलवान चिखलाने माखून गेले होते.
सूर्याजीला बिल्लाचा प्रचंड राग आला होता ,पुन्हा कुस्तीला सुरवात होताच प्रचंड ताकतीने सूर्याजीने बिल्लाला ओढले आणि एका क्षणात कालाजंग डावावर बसला…आकस्मित हल्ल्याने धनाचा तोल गेला आणि धनाचे सर्वांग सुर्याजीच्या खांद्यावर गेले….सूर्याजीने धनाच्या दंड आणि मांडीत हात घालून सूर्याजीला खांद्यावर घेतले आणि धनावरून कोलांटी मारणार इतक्यात विजेच्या चपळाईने धनाने सुर्याजीच्या लांघेत हात घालून त्याला जमिनीवर दाबले आणि एका पायाने जमिनीला टेकू देत सूर्याजीला पुन्हा खाली घेतले ….सूर्याजी खाली जाणार तितक्यात दोन्ही पाय समोर करत गरदिशी दसरंग फिरत फिरवत सूर्याजी धनाच्या कब्जातून सुटला आणि धनाच्या समोर उभा राहिला…उभा राहतो न राहतो तितक्यात पुन्हा सूर्याजीने धनाचा दुहेरी पट काढला…हे इतक्या जलद झाले कि आता मात्र धनाचा पट निघाला आणि सूर्याजीने धनावर कब्जा मिळवला..!

पुन्हा प्रेक्षकातून टाळ्या वाजू लागल्या.
उपस्थित कुस्तीशोकीन चवड्यावर उभे राहून कुस्ती पाहू लागले.मागच्या लोकाना कुस्ती दिसेना म्हणून मागचे लोक खडे मारू लागले आणि गोंधळ सुरु झाला ,पण कुस्तीकडे सर्वांचे लक्ष होते.

धनाने ताडले,सूर्याजी चपळ आहे,जिद्दी आहे ,कठोर मेहनती आहे फुकटचे न घेणारा आहे आणि संधीचा अचूक वापर करून घेणारा आहे…!

सूर्याजीने सारी ताकत एकवटली आणि धनाच्या मानेवर गुडघा ठेवला,दोन्ही हाताने लांघ धरली आणि धनाला पाठीमागून उचलू लागला.
धना सावध होता …धनाने थोडी ताकत ढिली केली आणि मागून तो उचलला गेला …..त्याचे सर्वांग हवेत गेले आणि धनाने क्षणात गिरकी घेतली आणि सुर्याजीवर डंकि मारली आणि सुर्याजीच्या अंगावर जाणार इतक्यात सूर्याजीने सर्व कब्जा सोडत स्वताचा बचाव केला आणि धना ला कब्जा देण्या ऐवजी सुटका केली …प्रेक्षकातून पुन्हा टाळ्या येऊ लागल्या.
कुस्तीला जवळपास २ तास होत आले.दोन्ही पैलवान पुरते थकले होते.
काही कुस्ती शौकीन बोलू लागले कि कुस्तीने पैसे फिटले आहेत,आता कुस्ती बरोबरीत सोडवा ..पण इतर मंडळीनी चप्पल फेकून मारू लागले आणि विरोध दर्शवला.
सूर्य अस्ताकडे जावू लागला आणि धनाने पुन्हा सेनापातीना खून केली ….सेनापतीनी आता मात्र होकारार्थी मान दर्शवली आणि धना सावध झाला..!

कुस्ती पुन्हा लागली आणि हाताला हात भिडले आणि धनाने एका क्षणात सूर्याजीला ”ढाक” लावली आणि छातीवर बसला..!
उपस्थित कुस्तीशौकीन आनंदाच्या भरात टाळ्या वाजवू लागले…!
सारे प्रेक्षक खुश होते ,व्यासपीठावरून वस्ताद,पाटील,आणि गावकरी सूर्याजीला आणायला जावू लागले आणि मैदानाच्या पश्चिम बाजूला प्रचंड स्फोट झाला..!
पलिकडेच संस्थांनच्या हत्ती बांधला होता,हत्ती या स्फोटाने बिथरला आणि त्याची साखळी तोडून समोरची भिंत पाडुन थेट मैदानात घुसला….!!
लोकाना ,पोलिसाना आणि कोणालाच समजेना स्फोट कसला,प्रचंड चेंगराचेंगरी सुरु झाली आणि ,मैदानाच्या एका निमुळत्या प्रवेशदारातून पुराचे पाणी बाहेर पडावे असा लोकांचा लोंढा बाहेर पडू लागला आणि हे कमी होते म्हणून कि काय सार्या शहराची वीज अचानक गेली….!!
हत्तीने त्याचे महाकाय रूप पुन्हा दाखवायला सुरु केले.
दिसेल त्याला सोंडेत उचलून आपटायला सुरवात केली.
प्रचंड गोंधळ,चेंगराचेंगरी मुळे सर्वजन गोंधळले आणि स्फोटाच्या प्रकाशाने सारे मैदान उजळत होते,मात्र लोकांच्या गोंगाटाशिवाय काहीच दिसत नव्हते..!

धना आणि सेनापती यांच्या नियोजनाप्रमाने कुस्ती स्फोट घडवून ,विज घालवुन धनाला बाहेर न्यायचे होते,पण ही हत्ती बिथरून लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ हां केवळ आकस्मित होता.
सगळा गोंधळ झाला
हत्ती माणसांना पायदळी तुड़वत मस्तकावर पाय देत होता..!

धना परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला,पण हत्ती बिथरने हे काही नियोजनात नव्हते.
सेनापती आणि 100 एक तरुण साथीदारानी धना ला वेढा दिला आणि इथून निघले पाहिजे असा संकेत दिला,धना ने होकारार्थी मान हालवली आणि निघनार इतक्यात सुर्याजी पूर्णपणे दमुन जमिनीवर पालथा पडला होता,धना ने त्याला उठवले पण पण त्याला इतका दम लागला होता की उभाही राहता येत नव्हते..!
सेनापती पुढे सरसावले आणि धनाला बोलले…धनाजी सर्वात महत्वाचे हत्ती आवरला पाहिजे..!
असे बोलताच सेनापती हत्ती आवरायला निघाले,हे पाहताच धनाने सेनापती चा हात धरला…सेनापती जी नको…आपण नको…मी जातो…!
धनाने तश्याच चिखलाने माखलेल्या अंगाने त्या चवताळलेल्या हत्तीकडे मोर्चा वळवला…!
सुर्याजी भानावर आला आणि त्यालाही परिस्थितीचा अंदाज आला…!

इकडे लोक हत्तीच्या भीतीने मैदानाच्या पूर्वेकडे सरकत होते आणि धनाने हत्तीच्या पुढे जावून एक विशिष्ट उभी नमस्कार पध्दत घातली…!!!

वस्ताद,पाटिल आणि सारे गावकरी तो विलक्षण प्रकार पाहू लागले…!

रागाने बेभान झालेला हत्ती मात्र बेताल किंचाळत धनावर धावून आला आणि क्षणभर लोकांच्या हृदयचा थरकाप उडाला..!!

क्रमशः
१४ वा भाग उदया!

Author:

I am determined to be cheerful and happy in whatever situation I may find myself. For I have learned that the greater part of our misery or unhappiness is determined not by our circumstance but by our disposition. Facebook Profile: https://www.facebook.com/y.gavhale1 Email : y.gavhale@gmail.com

2 thoughts on “”धना” भाग १३ वा

Leave a comment